सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ कार्यशाळेचे आयोजन
पुणे ,ता.१ :- शिरूर येथे सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ या विषयावर प्रभावी आणि विचारप्रवर्तक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयाची गरज आणि महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनाली हारदे आणि संगीता पाटील या मान्यवर उपस्थित होत्या. डॉ. सोनाली हारदे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्यासमोरील सामाजिक, मानसिक, आहारविषयक व आत्मरक्षणाच्या अडचणींवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संगीता पाटील यांनी विद्यार्थिनींना आपल्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला. तसेच, त्यांनी महिलांसाठी असलेल्या कायदेशीर हक्क, धोरणात्मक सवलती व सुरक्षिततेबाबत माहिती देत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजया पाडवळ यांनी समर्थपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन प्रा. सारिका झाडे यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव श्री. धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धनजी थिटे आणि संस्थेचे समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ यांनी सर्व सहभागी व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
Comments
Post a Comment