अरविंद एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांनी बनविल्या वैविध्यपूर्ण राख्या
सांगवी, दि.८ : - 'सण आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरांजनाने भावाला ओवाळण्याचा' या उक्तीप्रमाणे जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, ज्युनिअर कॉलेज आणि लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलमधील विद्यार्थ्यांनी विविध कल्पना वापरून वैविध्यपूर्ण राख्या बनविल्या. या राख्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राखी बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध युक्त्या वापरून रंगबिरंगी व वेगवेगळ्या आकाराच्या राख्या बनविल्या. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना चॉकलेट भेट दिले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की आज समाजात नातेसंबंधाचे महत्त्व कमी होत असताना शाळेत असे सण समारंभ साजरे करणे गरजेचे आहे. प्रणव राव म्हणाले, की समाजाच्या जडणघडणीत रक्षाबंधनाचा उपयोग व्हावा व आपापसात स्नेहमय वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
रक्षाबंधन सण का साजरा केला जातो, याविषयी माहिती शिक्षिका बिस्मिल्ला मुल्ला यांनी दिली. शिक्षिका दीपाली भदाणे व दर्शना बारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धांचे नियोजन कीर्ती शिंपी, ज्योती मोरे, दीपाली भदाणे, पिंकी मणिकम, वासंती भोळे, सोनाली शिंदे, सोनाली मोरे, वैशाली नागणे, ममता पवार यांनी केले. शिक्षिका स्वाती तोडकर, स्मिता बर्गे, उत्तरा खटावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
Comments
Post a Comment