मैत्री दिन विशेष : मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ! ; ...त्याचे हात जोडण्यासाठी मित्रांचे शेकडो हात सरसावले

थेरगावच्या राहुलने मित्रांच्या साथीने घेतली नव्याने उभारी.
 दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही, मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात थेरगावच्या राहुलची घटना ऐकून.. तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस !. गुजर नगर, थेरगावातील सामान्य कुटुंबातील राहुल कणगरे ऐन उमेदीतला तरुण. गेल्या महिन्यात काही समाज कंटकांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करत त्याच्या दोन्ही हाताचे पंजे छाटले. स्वप्नांनी भरलेला राहुल एका क्षणात निराशेच्या गर्तेत लोटला गेला. पण ही कहाणी फक्त दुखाची नाही, तर मित्रांच्या नि:स्वार्थ प्रेमाची, एकजुटीची आणि मानवतेची आहे, ज्याने राहुलला पुन्हा आयुष्याकडे आशेने पाहण्याची ताकद दिली. त्याचे दोन हात जोडण्यासाठी शेकडो हात त्याच्या मदतीसाठी सरसावले.

थेरगाव,या.५ :- राहुल (वय ३३) मेहनती आणि हसतमुख तरुण. तो आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या आयुष्यातील हा प्रसंग त्याच्यासाठी, कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता. दुर्दैवी हल्ल्याची बातमी कुटुंबासाठी आकाश कोसळल्यासारखी होती. राहुलच्या स्वप्नांचा, त्याच्या मेहनतीचा आणि त्याच्या आत्मविश्वासाचा आधारच नष्ट झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की, प्रगत शस्त्रक्रियेद्वारे त्याचे हात पुन्हा जोडले जाऊ शकतात, पण त्यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात होता. हा खर्च राहुलच्या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता.
मित्रांना जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्यांनी हार मानली नाही. मित्र विकास असवले, योगेश राणवडे, नारायण वाघमोडे, रवी भिलारे, स्वप्निल कुंभार, आकाश हेगडे, हरी वाघमोडे आणि इतर काही जणांनी आधार देत एकजुटीची ताकद दाखवली. त्यात वंदे मातरम महिला मंडळा नेही पुढाकार घेतला. आपल्या मित्राला पुन्हा आयुष्य जगण्याची संधी मिळालीच पाहिजे या निश्चयातून मित्रांनी "एक हात मदतीचा राहुल साठी" हा व्हाट्सअप ग्रुप तयार केला शस्त्रक्रियेसाठी मदत गोळा करण्याची मोहिम उघडली. अवघ्या काही आठवड्यांत मित्रांनी मिळून शस्त्रक्रियेसाठी लागणारी साडे पाच लाख इतकी मोठी रक्कम जमा केली.

आता आधार देण्याची आमची वेळ
राहुल आमचा मित्र आहे, आमचा भाऊ आहे. त्याने नेहमी आम्हाला हसवले, आम्हाला साथ दिली. आता आमची वेळ आहे त्याला आधार देण्याची,” असं राहुलचा मित्र विकास असवले याने झुंज न्यूजशी बोलताना सांगितले . मित्रांनी केवळ निधी गोळा केला नाही, तर राहुलच्या कुटुंबाला मानसिक आधारही दिला. त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, मला वाटलं माझं आयुष्य संपलं. पण माझ्या मित्रांनी मला पुन्हा जगायला शिकवलं,” राहुलने डोळ्यात पाणी आणत सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं होतं.

यशस्वी शस्त्रक्रिया ; नव्या आशेचा किरण
जमा झालेल्या निधीच्या आधारे राहुलवर पिंपरी तील एका नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने त्याचे दोन्ही हातांचे पंजे पुन्हा जोडले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि राहुल हळूहळू बरा होऊ लागला. शस्त्रक्रियेनंतर त्याला फिजिओथेरपी आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागले, पण त्याच्या मित्रांनी त्याला कधीच एकटा सोडला नाही. ते नियमितपणे रुग्णालयात येत, त्याच्याशी गप्पा मारत, त्याला प्रोत्साहन देत.

माणुसकी आणि एकजूट
ही कहाणी आहे थेरगावच्या राहुलची, ज्याला त्याच्या मित्रांनी आणि समजाने खऱ्या अर्थाने आधार दिला. ही कहाणी सांगते की, माणुसकी आणि एकजूट यांच्यासमोर कोणतीही अडचण मोठी नाही. राहुलच्या मित्रांनी दाखवून दिलं की, खरे मित्र केवळ हसण्यातच नव्हे, तर संकटातही खंबीरपणे साथ देतात. आणि या सगळ्यातून राहुलला मिळालं.. एक नवं आयुष्य, नव्या आशा आणि मित्रांच्या प्रेमाचा अखंड आधार!

हा मैत्रीचा, माणुसकीचा विजय आहे. माझ्या मित्रांनी केवळ पैशाची मदत केली नाही, तर मला आयुष्याकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या एकजुटीने आणि निस्वार्थ प्रेमाने मला पुन्हा स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली. आज मी हळूहळू आपले हात पुन्हा वापरायला शिकत आहे. मी ठरवले आहे की, पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करेल आणि मित्रांचे आणि समाजाचे हे ऋण कधीच विसरणार नाही.
- राहुल कणगरे, पीडित तरुण


Comments

Popular posts from this blog

करियर कौन्सिलिंग सीए विषयावर एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय काळेवाडी येथे मार्गदर्शन.

मोशी येथील सर्पमित्रांनी नागपंचमीच्या दिवशी दिले तब्बल बारा नाग जातीच्या सापांना जीवनदान.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत